Archive | January, 2016

मैत्र

7 Jan

अडगळीच्या खोलीत कधीतरी खरडलेल्या ओळींचा कागद सापडला. आणि मग एक ओळ दुसऱ्या ओळीसाठी वाट मोकळी करू लागली..

आठवणींचा पसारा, जसा वळीव झिम्माड.

काही क्षण उंबऱ्याशी, काही डोंगर पल्याड.

*

कधी नकळत माझ्या, मैतराची पडे गाठ,

कधी ठेच लागली अन् कधी थोपटली पाठ.

अशा कितीक क्षणांच्या आठवणी त्या खटयाळ,

काही क्षण उंबऱ्याशी, काही डोंगर पल्याड.

*

कधी सुखाचा तो पूर, कधी दुखाची ही लाट,

कधी अंधारली रात, कधी उजळ पहाट.

साथ मैतराची आणावया किनारी अल्याड,

काही क्षण उंबऱ्याशी, काही डोंगर पल्याड.

*

अशा ऋणानुबंधांचा, जपावा तो ठेवा,

आपल्यासारखा आपल्याला ओळखणारा कुणी हवा.

दूर दूर असो तरी, घट्ट मैतराची गाठ,

काही क्षण उंबऱ्याशी, काही डोंगर पल्याड. 

**

%d bloggers like this: